सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीअंतर्गत सांगली-कोल्हापूर मार्गावरील विष्णूअण्णा पाटील फळे व भाजीपाला दुय्यम बाजार सीताफळासाठी सर्वदूर प्रसिद्ध झाला आहे. येथे खुल्या लिलाव पद्धतीने सौदे होऊन दर चांगले मिळतात, सांगली, सोलापूर, पुणे व अन्य जिल्ह्यांतील शेतक-यांसाठी हक्काच्या ठरलेल्या या बाजारपेठेची उलाढाल १६० कोटींच्या पुढे पोहोचली आहे. बाजार समितीने १९८८ च्या दरम्यान सांगली-कोल्हापूर मार्गावर सुमारे ११ एकर ३८ गुंठे जागा विकत घेतली. पुढे बाजार समितीचे पदाधिकारी आणि व्यापारी कै मदन पाटील यांच्याकडे प्रस्ताव घेऊन गेले,कै पाटील हे महाराष्ट्राचे जेष्ठ नेते व माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांचे नातू होते. एकत्रित प्रयत्नातून पणन मंडळाकडे प्रस्ताव व पाठपुरावा झाला.


