जत (जि. सांगली) तालुक्यात सांगली बाजार समिती अंतर्गत श्रीमंत विजयसिंहराजे डफळे दुय्यम बाजार आवाराची स्थापना १९६७ मध्ये झाली. या बाजार समितीत शेतकरी डाळिंब, करडई, कडधान्य घेऊन येतात. जत तालुक्यात पूर्वी भुईमुगाची लागवड मोठ्या प्रमाणात व्हायची. त्यामुळे ही बाजारपेठ भुईमुगासाठी प्रसिद्ध होती. अलीकडील काळात करडईलाही मागणी वाढू लागली आहे; मात्र भुईमूग पिकानंतर अलीकडील काळात जत तालुक्यात उडीद हे पीक महत्त्वाचे ठरू लागले आहे. त्यामुळे या बाजारपेठत उडदाचे महत्त्व वाढू लागले आहे. उडीद हे पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेले म्हणजेच जिरायती पीक आहे. जत तालुक्यातील कायम अवर्षणाची परिस्थिती पाहता येथील शेतकरी पैसे देणारे पीक म्हणून उडदाकडे पाहू लागले आहेत. त्याचा उत्पादन खर्चही कमी असल्याने शेतीसाठी आर्थिक भांडवलासाठी त्याचा आधार शेतकऱ्यांना वाटत आहे.


